राजा राममोहन रॉय आणि सती प्रथा निवारण

When the social reformer challenges society there is nobody to hail him a martyr. There is nobody even to befriend him. He is loathed and shunned. But when the political patriot challenges Government he has whole society to support him. He is praised, admired and elevated as the saviour. Who shows more courage?”-The social reformer who fights alone or the political patriot who fights under the cover of vast mass of supporters?
- डॉ. बी.आर. आंबेडकर

ब्रजविनोद रॉय शेवटच्या घटका मोजत होते.

त्यासमयी त्यांना गंगाकिनारी आणले गेल. ब्रजविनोद रॉय यांना अंत्यसमयी त्यांना सिरामपोर जिल्ह्यातील श्यामाचरण भट्टाचार्य यांनी एक वर मागितला.
ब्रजविनोद बाबूंनी गंगेची शपथ घेउन त्यांना रुकार दिला. ह्यावर श्यामाचरण बाबूंनी वर मागितला की त्यांच्या कन्येचा, ब्रजविनोद बाबूंच्या सात पैकी एका पुत्राशी विवाह करावा. श्यामाचरण बाबू हे भंग (कमी दर्जाच्या) कुळातील तर होतेच शिवाय ते शाक्तही (शक्ती चे उपासक) होते आणि रार्‍ही ब्राम्हण असलेले रॉय बाबू हे वैष्णव (चैतन्यचे(विष्णू) उपासक) होते. शाक्त आणि वैष्णव यांच्यात बेटीसंबंध ही फार अवघड गोष्ट होती. पण रॉय बाबूंनी तर गंगामातेची शपथ घेउन वचन दिल होत.
रॉय बाबूंनी त्यांच्या सगळ्या पुत्रांना आपल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी विचारल असता रमाकांत बाबू सोडून इतर सर्वांनी नकार दिला.

यथासांग रमाकांत बाबू यांचा विवाह श्यामाचरण यांची कन्या तरीणी देवी, ज्या पुढे फूल ठकुरानी या नावाने ओळखल्या गेल्या, यांच्याशी झाला. या दांपत्याला पुढे दोन पुत्र, जगन्मोहन (की जगमोहन?) आणि राममोहन आणि एक कन्यारत्न प्राप्त झाले. हा राममोहन म्हणजेच राजा राम मोहन रॉय.

राजा राम मोहन रॉय यांना परंपरांनी जखडलेला भारत आणि सर्व परंपरा झुगारून देणारा भारत यांच्यामधील पूल अस म्हटल जात. त्यांच जीवन कार्य इतक प्रचंड आणि असाधारण आहे की त्याचा केवळ एकाच लेखात धावता आढावा घेणदेखील शक्य नाही.

त्यामुळ इथे या लेखात त्यांच्या सतीप्रथेविरुध्दच्या कार्याची फक्त ओळख करायचा हा एक प्रयत्न आहे. ह्यातील माहीती जास्तीत जास्त अचूक येइल यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेला असला तरीदेखील सूक्ष्मशी चूक आढळल्यास तत्काळ निदर्शनास आणावी ही विनंती.

जन्म आणि शिक्षण

२२ मे १७७२ (१७७४?) रोजी बंगालमधील राधानगर येथे जन्मलेल्या राममोहन यांच्या जडणघडणीत त्यांच्या माता-पित्यांच्या घराण्यांचा संबंध फार मोठा आहे. वडीलांकडील सर्व मंडळी आधुनिक शिक्षण घेतलेली आणि बहुतांश सरकार दरबारी मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणारी होती. त्यामुळ त्यांच्या वडीलांनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांना अरबी, फारसी या त्याकाळच्या सरकारात / व्यवहारात वापरल्या जाणार्‍या भाषा आणि शास्त्र शिकण्यासाठी पाटण्याच्या एका मदरशात (मुक्तब) पाठवल. मदरशामधे अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते.
तिथ शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी आईच्या प्रभावामुळे, ज्यांच्या माहेरची मंडळी प्रामुख्यान पौरोहित्य करणारी होती, धार्मिक शिक्षण घेण्यासाठी म्हणून बनारस (काशी) इथ त्यांना पाठवण्यात आल. तिथ त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदांत, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारस मधे वास्तव्य केल.

हे अस दोन टोकाच्या किंवा पूर्ण वेगवेगळ्या व्यवस्थेत शिक्षण घेउन राम मोहन वयाच्या सोळाव्या वर्षी घरी परत आले. घरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे  लिहीला. यामधे त्यांनी मूर्तीपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्यामते मूर्तीपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळ वडीलांशी त्यांचे पटेनास झाल आणि स्वत्:च घर सोडून निघून गेले.

भटकत भटकत ते तिबेट पर्यंत गेले. तिथे बुद्ध धर्माच्या प्रमुख भूमीत त्या धर्माचा अभ्यास चालू केला. परंतू तिथ शिकवल्या जाणार्‍या एकेश्वरवादाची मते त्यांना पटली नाहीत. त्यांचे मत त्यांनी उघड बोलून दाखवल असता त्यांना हिंसेचा सामना करावा लागला, आणि प्रकरण जीवावर बेतल. त्यावेळी काही स्थानिक स्त्रीयांनी राम मोहन बाबूंचा जीव वाचवला. ह्या प्रसंगान त्यांच्या मनात स्त्रीयांविषयी अतिशय आदरभाव उत्पन्न झाला.

दरम्यानच्या काळात रमाकांतबाबूंनी पुत्राला शोधण्यासाठी काही लोक पाठवले होते. वडीलांचा निरोप मिळाल्यावर राम मोहन बाबू पुन्हा एकदा घरी आले. घरी आल्यावर वडीलांनी त्यांच लग्न लावून दिल.

सती प्रथेशी संबंध आणि विरोध

इ.स. १८१२ मधे त्यांचे थोरले बंधू जगन्मोहन यांचा मृत्यू झाला. त्याप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांनी बळजबरीन जगन्मोहन यांच्या पत्नीला सती जायला लावल. राम मोहन यांनी त्याप्रसंगी विरोध केला, पण तो प्रकार थांबवू शकले नाहीत.

त्या काळात स्त्रीया सती जाण्याच प्रमाण प्रचंड होत. तत्कालीन पंडीतांच्या मते पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीपुढे दोनच पर्याय असत. एक  म्हणजे सर्व सुखांचा त्याग करून अत्यंत कठोर नियमांनी बद्ध अस जीवन जगणे किंवा दुसरा पर्याय म्हणजे सती जाणे. एकदा स्त्रीनं सती जाण्याचा निर्णय घेतला असता तिला त्यापासून परत फिरता येत नसे. अर्थात ज्या समाजात स्त्रीला मूळातच दुय्यम स्थान होत (/आहे) आणि जिला स्वतःचा आवाजच नव्हता ती हा निर्णय स्वतः घेत असेल ही शक्यताही धूसरच आहे.

भावनेच्या भरात एखाद्या स्त्रीन असा निर्णय घेउन नंतर चितेवर गेल्यावर तिथून परत फिरायचा प्रयत्न केला तर तिला मोठ्या मोठ्या बांबूंच्या सहाय्यान आत ढकलंल जात असे. तिचा आक्रोश कोणाला ऐकायला येउ नये यासाठी तिथ मोठ-मोठी वाद्य वाजवली जात. कलकत्त्याच्या स्मशानभूमीत वाद्यांच्या गजरात पतीच्या चितेवरती बळजबरीन जाळल्या जाणार्‍या स्त्रीया हे नेहमीच दृश्य असे. बरेचदा त्या स्त्रीला नशा येणारा भांग किंवा तत्सम पदार्थ दिला जात असे आणि त्या अमलाखाली असतानाच ती चितेवर गेली की तिला तिच्या मृत पतीच्या प्रेताशी बांधून टाकण्यात येई.

बंधू च्या मृत्यूनंतर अशाप्रकारे त्यांच्या पत्नीला देखील जाळल्यामुळ राम मोहन प्रचंड व्यथित झाले आणि त्यांनी सती प्रथे विरोधात मोहीम उघडली. राम मोहन बाबू स्मशानात जाउन सती जाणार्‍या स्त्रीयांच मन वळवायचा, त्यांना सती जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत.

ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीन १७९८ साली कलकत्त्यामधे सर्वप्रथम सतीबंदी कायदा लागू केला. परंतु हा फक्त कलकत्ता शहरापुरताच लागू होता.
त्यानंतर विल्यम कॅरे हा ख्रीश्चन मिशनरी आणि विल्यम विल्बरफोर्स या दोघांनी सती प्रथेविरुद्ध आंदोलन आणि प्रचार सुरु केला. याची दखल घेउन कंपनी सरकारन १८१३ मधे सती जाणार्‍या स्त्रीयांची मोजणी सुरु केली.

सती प्रथेचे बळी

इ.स. १८१५ ते १८२८ या दरम्यान सती प्रथेमुळे किती हिंदू स्त्रीया प्राणाला मुकल्या याची सरकारी आकडेवारी खालीलप्रमाणे;

१८१५ १८१६ १८१७ १८१८ १८१९ १८२० १८२१ १८२२ १८२३ १८२४ १८२५ १८२६ १८२७ १८२८
कलकत्ता २५३ २८९ ४४२ ५४४ ४२१ ३७० ३७२ ३२८ ३४० ३७३ ३९८ ३२४ ३३७ ३०९
ढाक्का ३१ २४ ५२ ५८ ५५ ५१ ५२ ४५ ४० ४० १०१ ६५ ४९ ४७
मुर्शीदाबाद ११ २२ ४२ ३० २५ २१ १२ २२ १३ १४ २१ १०
पटना २० २९ ४९ ५७ ४० ६२ ६९ ७० ४९ ४२ ४७ ६५ ५५ ५०
बनारस ४८ ६५ १०३ १३७ १०३ ११४ १०२ १२१ ९३ ५५ ४८ ४९ ३३
बरेली १५ १३ १९ १३ १७ २० १५ १६ १२ १० १७ १८ १०
एकूण ३७८ ४१२ ७०७ ८३९ ६५० ५९७ ६५४ ५८३ ५५७ ५७२ ६३९ ५११ ५१७ ४६३

राम मोहन रॉय यांच्यामते संपूर्ण बंगाल प्रांतात (जो आजच्या पश्चीम बंगालपेक्षा बराच मोठा होता) प्रत्यक्षात सती जाणार्‍या स्त्रीयांची संख्या या आकडेवारिच्या दसपट तरी असेल. ज्येष्ठ बंधूंच्या पत्नीच्या मृत्यूनंतर राम मोहन यांनी थेट स्मशानात जाउन सती जाणार्‍या स्त्रीयांना थांबवण्याचा प्रयत्न केला. काही प्रसंगी ते यशस्वी देखील झाले.

१८१८ मधे प्रथेला विरोध करणारा एक लेख प्रसिद्ध केला. यामधे एक प्रथेचा समर्थक आणि एक विरोधक यांच्या संवादातून त्यांनी सती प्रथेच्या समर्थनार्थ दिल्या जाणार्‍या कारणांच खंडन केल आहे. त्यांनी मांडलेले बहुतांश मुद्दे हे आजही जसेच्या तसे, लागू होतात.
ह्या लेखात त्यांनी चर्चेला घेतलेले प्रमुख मुद्दे म्हणजे स्त्रीया ह्या मुळातच पुरुषांपेक्षा हीन आहेत, त्यांची शारिरिक क्षमता पुरुषांपेक्षा कमी आहे. स्त्रीया निर्बुद्ध असतात, निर्णय घ्यायला सक्षम नसतात. त्यांच्यावरती (चारित्र्या बाबतीत) विश्वास ठेवला जाउ शकत नाही . त्या फार भावनिक असतात. हे आणि इतरही काही मुद्दयांचा समाचार त्या निबंधात घेतला आहे.
त्या काळच्या प्रथेच्या समर्थकांनी ही सगळी कारण हे स्त्रीच अस्तीत्वच गौण असत, तिला तिचा पती हाच परमेश्वर असतो आणि त्याच्याशिवाय तिच अस्तित्वच नाही हे सिद्ध करण्यासाठी हा सगळा प्रपंच केला होता अस दिसतय. (“त्या काळच्या” समर्थकांनी अस म्हणायच कारण उपसंहारात आहे.)

सती जाणे ही वरवर जरी धार्मिक प्रथा दिसत असली तरी अनेकदा एखाद्या स्त्रीला सती जायला लावण्यात लोभी नातेवाईकांचादेखील हात असे. ह्यामुळ धर्माचा सर्रास आधार याकामी घेतला जात असे. त्यामुळ १८३० मधे, सरकारन १८२९ मधे या अमानुष प्रथेवर बंदी घातल्यानंतर, राम मोहन बाबूंनी Suttee and the Shastras असा एक लेख लिहीला. यामधे त्यांनी वेद, स्मृती, भगवद्गीता यांतील अनेक श्लोकांचा आधारे या प्रथेला शास्त्राधार नाही हे दाखवून दिल. त्यात त्यांनी अंगिर आणि व्यास ऋषी यांचे प्रथेचे समर्थन करणारे तर मनु, याज्ञवल्क्य, भगवद्गीता यांचे ही प्रथा सक्तीची नसून सर्वस्वी ऐच्छीक असल्याचे दाखले दिले आहेत.

फलित

४ डिसेंबर १८२९ रोजी, राजा राम मोहन रॉय आणि इतरांच्या प्रयत्नाला यश येउन, सती प्रथा बंद करण्याविषयीच विधेयक लॉर्ड विल्यम बेंन्टीन्क गव्हर्नर जनरल, व्ह्यायकाऊंट काँबरमीअर कमांडर-इन-चीफ, डब्ल्यू. बी. बेयले आणि सर सी. टी. मेटकाफ यांच्या संयुक्त समीतीन संमत केल.

१६ जानेवारी १८३० ला राम मोहन रॉय यांनी लॉर्ड विल्यम बेन्टीन्कला सती प्रथेवर कायद्यान बंदी घातल्याबद्दल अभिनंदन आणि आभाराच एक पत्र पाठवल.

परंतू यानंतरही सती प्रथेच्या समर्थक धर्म मार्तंडांनी, तत्कालीन सर्वोच्च न्यायपीठ म्हणजेच प्रीव्ही कौन्सीलपुढे याचिका दाखल केली. दिल्लीचा मुघल बादशहा अकबर दुसरा याच्यावतीन त्याची तनखा वाढवून देण्यासाठी “राजा” हा किताब देउन राम मोहन रॉय यांची नियुक्ती झाली होती. त्या बादशहाची बाजू मांडण्यासाठी राजा राम मोहन रॉय १८३० साली इंग्लडला गेले.

तिथे असतानाच त्यांनी सरकारपुढे सती प्रथेविरोधात पुन्हा एकदा बाजू मांडली.
११ जुलै १८३२ रोजी इंग्लंडच्या प्रीव्ही कौन्सीलपुढे या विधेयकाला विरोध करणारी याचिका फेटाळण्यात आली.

इंग्लंडमधील स्टेपलटन या गावी २७ सप्टेंबर १८३३ रोजी या महात्म्यान या जगाचा निरोप घेतला. दक्षिण ब्रिस्टल मधील आर्नोस वॅले दफनभूमीत त्यांच दफन करण्यात आल.

उपसंहार

ब्रिटीश कंपनी सरकारन १८२९ मधे कायदा करून यावर बंदी आणूनही १९४३ नंतर किमान ४३ स्त्रीया सती गेल्याची नोंद आहे.
४ सप्टेंबर १९८७ रोजी, राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील देवराला गावात १८ वर्षाची रूप कुंवर सती गेली. रूप कुंवरच्या सती जाण्याचे उदात्तीकरण करण्याच्या आरोपाखाली ज्या ११ लोकांवर गुन्हा दाखल केला त्या सर्वांना जयपूरच्या विशेष न्यायालयान “सबळ पुराव्याअभावी” ३१ जानेवारी २००४ रोजी मुक्त केल. याहून वाईट गोष्ट म्हणजे रूप कुंवर चे एक मंदीर देखील बांधण्यात आल आहे जिथ आता नियमीत यात्रा भरते आणि त्या यात्रेवर बंदी घालायला (सती प्रथेच उदात्तीकरण करायला कायद्यान मनाई असताना देखील) न्यायालयान नकार दिला आहे.

अलीकडील घटना: छत्तीसगढच्या रायपूर जिल्ह्यातील चेचेर गावची रहिवासी असलेली ७१ वर्षीय लालमती नावाची महिला १३ ऑक्टोबर २००८ रोजी सती गेली.

संदर्भः

१. Raja Ram Mohun Roy His Life Writings and Speeches
२. Sati Tradition – Widow Burning in India: A Socio- legal Examination
३. विकीपीडीया

मुंडक्यांच्या माळा…

वृत्तपत्र – एका वाचकाच्या नजरेतून

The public have an insatiable curiosity to know everything.  Except what is worth knowing.  Journalism, conscious of this, and having tradesman-like habits, supplies their demands.
Oscar Wilde

If you’re not careful, the newspapers will have you hating the people who are being oppressed, and loving the people who are doing the oppressing.
Malcolm X

छोटा शर्व नुकताच वाचायला शिकलाय. सकाळी सकाळी आलेला सकाळ वाचायचा त्याचा प्रयत्न चालला होता. एक एक अक्षर जोडून स्वारी वाचायला लागली; “क रा ड म धे    वा ळू     मा फि या चा     भ र दि व सा      खू न”.  मी वैतागून त्याच्या हातातन पेपर काढून घेतला आणि त्याला चांदोबाच पुस्तक दिल.

मी स्वतः साधारणपणे वर्षापूर्वी रोजच वृत्तपत्र घ्यायच बंद केल.  रोज उठून हेच वाचायच असेल तर कशाला विकतची पिडा. सव्वाशे कोटींच्या या देशात फक्त आणि फक्त वाईटच घटना घडतात अस वाटायला लागल.  इथे वाईट घटना घडतात मान्य आहे पण चांगल्या घटना घडतच नाहीत का? मागे माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा एक लेख फिरत होता. ते इस्त्रायलला गेले असता तिथल्या वृत्त्पत्रांमधे पहील्या पानावरती चांगल्याच घटना होत्या. वास्तविक तिथे आदल्या दिवशी एक स्फोटात ८-१० लोक ठार झाले होते. ही बातमी देखील सगळ्या वृत्तपत्रांमधे होती, पण दुसर्‍या पानावर. त्यांनी प्रश्न विचारला होता की आपल्या देशात हे का घडत नाही.

जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे| शहाणे करून सोडावे सकळ जन || अस काहीतरी वृत्तपत्रांच्या अस्तित्वाच कारण असाव, बहुतेक. चांगल्या वाईट घटना ह्या समाजात घडणारच, त्यात नवल नाही पण त्यातल्या वाईटच गोष्टींच भांडवल कराव आणि लोकांना सतत भीतीच्या छायेत ठेवाव हा अट्टाहास का? समा़जात आता सर्व काही वाईट घडत आहे, इथली लोकशाही कोसळणार आहे, कलीयुग आल आहे अशा काहीतरी भावना निर्माण व्हाव्यात अशा पध्दतीन घटनांच सादरीकरण का कराव?

जनतेच्या मनात कसली ना कसली भीती असावी ही गोष्ट जगातल्या सर्वच्या सर्व सरकारांच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे, मग ते कधी एखाद राष्ट्र असेल, कधी एखादी विचारसरणी असेल तर कधी एखादा रोग,  जे काही असेल ते, हे मान्य. वृत्तपत्रांची अशी कोणती हतबलता आहे? पण नाही, समाजाला सतत कसल्या ना कसल्या तरी भीतीखाली ठेवल नाही तर आपल्याला अस्तित्वच नाही अशी भीती वृत्तपत्रांना वाटते की काय कोणास ठाउक. प्रत्येक घटनेची सनसनाटी बातमी केली की आपण कृतार्थ झालो असा भाव सगळ्या वृत्तपत्रांच्या ठायी दिसतो.

बर ज्या वाइट घडामोडी ठळकपणे देतात, त्यांचा तरी नीट अभ्यास केलेला असतो, पूर्ण माहीती घेतलेली असते अस फार फार कमी कमी वेळेला दिसत. समस्या मांडताना एखाद्या माणसान भडक वक्तव्य केल की तवढच छापून रीकाम व्हायचं. बाळासाहेबांच किंवा राजसाहेबांच नाव घेतल की हे लगेच स्पष्ट होइल. ते जे मुद्दे मांडतात ते सोडून त्यांच्या शब्दांवरतीच सगळीकडे भर दिसतो. किंवा अनेकदा दोन कुटूंबाच्यातल्या वैरातून भांडण होतात आणि किमान पच्चीम महाराष्ट्रात तरी ही परंपरागत असतात. आता जर ही कुटूंब वेगवेगळ्या जातीची असली की झालच, हमखास दुसर्‍या दिवशीचा मथळा असतो जातीय दंगली. वास्तविक उरलेल्या जातीला यांच्याशी काही देणघेण नसत, पण नाही, सत्य लिहील तर वाचणार कोण? विदर्भातल्या आत्महत्यांविषयी कोणी स्वतः दहा-पाच गाव फिरून, कागद बघून, चौकशी करून काही लिहील आहे अस माझ्या वाचनात तरी कुठे आल नाही. सत्ताधारीपक्षवाल्यांनी छापायच की लोक दारू पिउन मरतात, विरोधकांनी छापायच की सगळेच आत्महत्त्या करतात. शिवाय हे करताना आत्महत्त्या ह्या घातकी प्रकाराची जाहीरात होते तिकडे तर कोणाला लक्ष द्यायलाच वेळ नाही.
वास्तविक, किमान महाराष्ट्राला तरी, पत्रकारिता ही काही नवीन गोष्ट नाही. एक शतकापेक्षा जास्त अनुभव गाठीशी असलेल्या क्षेत्रात प्रगल्भता आणि सर्वसमावेषकता वाढण्याच्या ऐवजी बालीशपणा आणि संकुचितता वाढत चाललेली दिसते.

सगळी वृत्तपत्र ही कुठल्या ना कुठल्या राजकीय विचारसरणीची (किंवा त्यातल्याच कोणाच्या तरी मालकीची) असतात. पण त्या पुढार्‍यांच्या एकमेकातल्या लाथाळ्यांपायी वृत्तपत्रांनी आपली पातळी सोडण हा हीनतम प्रकार आहे. ह्याच ताज उदाहरण म्हणजे सकाळ आणि पुढारी मधे रंगलेला कलगीतुरा. ह्यान कोल्हापूरकरांची काही काळ तरी चांगलीच करमणूक केली. त्यात सामील असलेले लोक किती स्वच्छ चारित्र्याचे आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण तरीही कितीतरी काळ वृत्तपत्रांसारख अत्यंत महत्त्वाच माध्यम ह्या लोकांनी स्वतःची मळमळ बाहेर काढायला वापरल.

व्यक्तीशः माझ्या दृष्टीन दृकश्राव्य प्रसारमाध्यमांपेक्षा छापील प्रसारमाध्यमांना खूप जास्त महत्त्व आहे.  कारण दृकश्राव्य माध्यमांचा परिणाम हा तत्काळ आणि प्रभावी असला तरी तो टिकाउ नसतो. त्यामुळच त्यांचा दर्जा हा वृत्तपत्रांपेक्षा कितीतरी खालचा असला तरी त्यावर लिहावस देखील वाटल नाही.

जे सकस ते लोकांपुढ ठेवाव का जे, लोकांना जस आहे अस वाटत, तेच त्यांना सांगाव असा प्रश्न ह्या क्षेत्रातल्या लोकांना पडायचा बंद झाला असावा अन्यथा कुठल्यातरी स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी झटणार्‍या दादाच नाव हे आमटे, बंग, प्राचार्य शिवाजीराव भोसले असल्या चांगल्या गोष्टींसाठी आयुष्य खर्च करणार्‍या माणसांपेक्षा जास्त लिहील गेल नसत.

‘प्रसार’माध्यम ह्या प्रकारात बसणार्‍या वृत्तपत्रांनी स्वतःचा क्षेत्रीय अवाका इतका मर्यादीत ठेवावा ह्या गोष्टीच देखील मला नवल वाटत आल आहे. पच्चीम महाराष्ट्रातल्या कोणत्याही बातमीत विदर्भाचा संदर्भ हा फक्त आणि फक्त आत्महत्यांशी लावला जातो तर विदर्भातल्या वृत्तपत्रांमधे पच्चीम महाराष्ट्र हा फक्त लाटलेल्या निधीविषयीच येतो. मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले अस म्हणणार्‍या महाराष्ट्राला या राष्ट्राच्या पूर्व सीमेवरती कोणत राज्य आहे हे तरी माहीती आहे का? हाच प्रश्न राष्ट्रीय वृत्तपत्र म्हणवून घेणार्‍यांनी स्वतःला आंतरराष्ट्रीय गोष्टींबाबत विचारावा. महासत्ता बनायला निघालेल्या आपलेल्या देशाला स्वतःच्या शेजारी काय चाललय ते माहीत नाही.

वर्तमानपत्राल्या सध्याच्या भाषेविषयी तर सगळाच आनंद आहे. मराठी वर्तमानपत्रात वापरली जाणारी भाषा ही बहुतांशवेळा हिंदीच शब्दशः भाषांतर करून कींवा हिंदीकडून उधार उसनवार शब्द घेउन लिहीली जाते, मराठीला शब्दांची भीक लागल्यासारखी. खरतर वार्ताहराकडून येणारी बातमी ही कोणाच्यातरी डोळ्याखालून जात असेल. पण प्रत्यक्ष वाचताना मात्र अशी काही व्यवस्था अस्तित्वात तरी आहे का अशी शंका येते.

असो, इथे वर्तमानपत्रांप्रमाणेच, नुसत्या समस्या निर्माण करून जबाबदारी झटकण्यापेक्षा, वर्तमानपत्रांकडून असणार्‍या तुमच्या अपेक्षा तुम्हीही लिहा. वाचकाला जर काही किंमत असेल तर किमान हे वाचल जाइल एवढी अपेक्षा करायला हरकत नसावी.

शिक्षण (?)

मी: काय मॅडम काय म्हणतय कॉलेज, नवीन विद्यार्थी?

मॅडमः अरे कोणी VLSI येणार असेल तर सांग, B.E. पाहीजे

मी: पण मागच्या वेळेस आपण भेटलो तेंव्हा तर तुम्ही वेगळाच विषयाला शिक्षक हवा म्हणून सांगितला होता

मॅडमः त्या विषयाला मिळाली एक मुलगी, आता VLSI ला असलेल्या मॅडमनी नुकताच राजीनामा दिला आहे, नवीन आलेले शिक्षक टिकतच नाहीयेत

मी: का?

मॅडमः ३ पॉलिटेक्नीक चालू झाले आहेत, आणखी ४ ला मंजूरी मिळाली आहे. त्यांनी पगार जास्त दिला की तिकडे जातात.

____________________________________________________________________________

घरी आलो तर माझा आत्तेभाउ आला होता. त्यान ह्या वर्षी एका नवीनच चालू झालेल्या पॉलिटेक्नीक मधे प्रवेश घेतला आहे.

भाउ: कधी आलास?

मी: काल रात्री. तुला कॉलेज नाही का?

भाऊ: अरे नाय, मास्तरन सोडून दिल.

मी: अरे हीरो तू इतके पैसे भरलेस तिथ जाण्यासाठी म्हणून, निदान त्याच्या माग लागायच ना शिकव म्हणून, पप्पांना कळल तर जोड्यान हाण्तील ना लेका.

भाऊ: अरे काय उपयोग नाय त्याचा , मास्तरांना काय येतच नाय. प्रॅक्टीकल करायला कॉलेजच्या लॅबमधे काही सामानच नाही, आमच्या मास्तरला आमच्या समोर उभ राहून धड बोलायला येत नाय मग काय करायच तिथ बसून, आलो निघून.

____________________________________________________________________________

नंतर रस्त्यात रव्या भेटला. ह्या महाशयांनी  ३ वर्षांच इंजिनीअरिंग ५ वर्षात आणि ३ वर्षांचा डिप्लोमा ४ वर्षात पूर्ण केला.

मी: काय रव्या कुठ आहेस लेका अजिबात दर्शन नाही.

रव्या: तुमचंच दर्शन नाही राव, तुमी आता मोठे लोक

मी: मग! काय चालू आहे सध्या?

रव्या: अरे तुला माहीत नाही? मी मास्तर झालोय

मी: कुठ?

रव्या: आपल्याच कॉलेजात

मी: काय सांगतोस, लै भारी काम झाल की राव.

रव्या: मग काय तर. अरे आत्ता २०,००० पगार देतात. आता सहावा वेतन आयोग लागू झाला की मग ३५,००० होइल, मस्तपैकी लग्न करायच. घराजवळ्च कॉलेज, २ तास शिकवायच आणि घरी यायच, टेंन्शन घ्यायच नाही.

मी: कोणाला शिकवतोस, डिग्रीला का डिप्लोमाला? रव्या: अरे त्यांनी डिग्री साठी घेतल आहे मला पण मला लै भीती वाटती यार त्या पोरांसमोर उभ राहायची , म्हणून मी डिप्लोमाच मागून घेतला.

____________________________________________________________________________

मागच्या वेळेस घरी गेलो होतो तेंव्हाचा हा किस्सा. सातारा शहराच्या आसपास आता या शैक्षणीक वर्षात एकूण ७ पॉलिटेक्नीक आणि आणि २ इंजिनीरींग महाविद्यालय असतील. ह्या वरच्या सगळ्या प्रकारानंतर मी माझ्या मित्रांबरोबर चर्चा केली तेंव्हा कळल की ही सगळी कॉलेजं (विद्यालय ?) बड्या बड्या पैसेवाल्या धेंडांची आहेत (हे वाक्य उगीचच टाकल अस वाटतय, कारण बड्या धंडांशिवाय दुसर्‍या कोणाला असल काही करताना कधी बघितलच नाही) आणि सगळीकडे गुणवत्तेच्या नावानी शिमगाच आहे. ही कथा एकट्या सातारा तालुक्याची आहे. अशीच परिस्थीती कराडला देखील आहे.

महाराष्ट्रात एकंदरीत ३५ जिल्हे आहेत, प्रत्येक जिल्ह्यात २ मोठी ठीकाण आणि प्रत्येक ठीकाणी सरासरी २ महाविद्यालय धरली तर १४० संख्या होते. इतक्या सगळ्या कॉलेजांत जाणार्‍या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गुणवान शिक्षकच नाहीत. आणि हे सगळ फक्त अभियांत्रिकी शी संबधीत बोलत आहे, बाकिच्या क्षेत्रांविषयी कल्पना नसली तरी परिस्थीती फार वेगळी नसावी. ज्यांना शिक्षक म्हणून घेतल जात त्यांची स्वतःची परिस्थीती वरच्या रव्या पेक्षा वेगळी नाही. ह्या लोकांना फक्त पुस्तकी ज्ञान आहे इंडस्ट्रीचा अनुभव नाही अस म्हणायचीदेखील सोय नाही कारण पुस्तकी ज्ञानाचाही वरच्या उदाहरणाप्रमाणे आनंदच आहे.

पुणे – मुंबई अशा महानगरातील हाताच्या बोटावर मोजण्याएवढी कॉलेज सोडली तर सगळीकड परिस्थीती सारखीच आहे. ह्या महाविद्यालयातून दरवर्षी हजारो अभियंते बाहेर पडणार आहेत, पण बाहेर पडून नक्की काय करणार हा प्रश्नच आहे. जर शिक्षकांनाच काही येत नसेल, शिकवायच सोडून द्या, तर पोर काय शिकणार, घंटा ? बर हे सगळ कमी म्हणून की काय ह्या सगळ्या नवीन संस्थांची अशी जातीची समीकरण आहेत. ते आपल्या जातीच्या बाहेरच्या व्यक्तीला शिक्षक म्हणून घ्यायला तयार नाहीत, आणि ह्याच्यात सगळ्या जातीतले शिक्षण सम्राट असल्यान ह्या बाबतीत जाती – समानता आहे. बर ते किमान आपल्या जातीतल्या हुशार लोकांना घेतील तरी चालेल पण तसही नाही.

इलेक्ट्रॉनिक्स मधून डिग्री घेउन पास झालेल्या एका विद्यार्थ्याचा इंटर्व्यूला बिचार्‍याला ओहमचा नियम येत नव्हता (हे उदाहरण फार स्पेसिफीक आहे, पण ही अपेक्षा जास्त आहे का?). आता कोणी म्हणेल की मग बाकिच्या लोकांनी शिकूच नये का? अहो पण एखाद्या विषयाच शिक्षण म्हणजे फक्त त्याच्याशी संबंशीत सुरळ्या गोळा करण आहे का?

हे सगळ लिहीलय ते सातारच्या आसपास जे अभियांत्रीकी, वैदयकीय, व्यवस्थापन या प्रकारच्या कॉलेजांच जे वारेमाप पीक आलेल आहे त्यांच्याशी संबंधीत लोकांशी जी चर्चा होते त्याच्या आधारे. त्याला आत्ता माझ्याकडे आकडेवारीचा आधार नाही. ह्या असल्या व्यवस्थेतून शिक्षण घेउन बाहेर पडलेले लोक जेंव्हा शिकवायला येतील तेंव्हा काय होइल याची कल्पनाच करवत नाही, अर्थात त्याची बहुधा गरज पडणार नाही कारण ते काही काळात प्रत्यक्षच घडेल.

यावर उपाय काय? समस्या तर प्रचंड गंभीर आहे निश्चितच.

मला वाटत आपल्याकडे ३ उपाय आहेतः

१. राजकारणी-शिक्षणव्यवस्था यांच्या नावान खडे फोडण

२. काहीच न करणे (हा उपाय आहे?)

३. स्वतःच शिक्षण सम्राट बनण

४. आपल्याला जे शक्य आहे ते करण.

जे लोक शिकून बाहेर पडलेत आणि ज्यांच्यात बदल घडवायची, समाज वगैरे नाही तर आपापल कॉलेज फक्त, ताकत आहे अशा लोकांनी बदल घदवण्यात हातभार लावण. ज्यांना ज्यांना वाटत की हे हे बदल घडावेत त्यांनी त्यांनी, महीन्यातून एखादा दिवस फक्त जास्त नाही, जर आपापल्या शाळा कॉलेजांसाठी दिला तर आपण खरीखुरी अहिंसक क्रांती घडवू शकू.

कोणीतरी म्हटल आहे की ह्या जगातल्या सगळ्या वाईट गोष्टींना वाईट लोक नव्हे तर सद्गुणी पण निश्क्रिय लोक कारणीभूत आहेत. समाज बदलो न बदलो, आपण काहीतरी वाईट घडत असताना बघत न बसता ते थांबवायचा किमान प्रयत्न केल्याच समाधान तरी मिळेल.

काय म्हणता?

Categories: समाज Tags:

भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग – ३

मनसे च्या वादळानंतर मी ही माहीती इतरांना (अर्थातच ज्यांना नसेल त्यांना) देण्याच्या उद्देशान हे लिहायला घेतल खरं. परंतू तिसरा भाग लिहायच्या आधीच तेलंगाणाची आणि तदनंतर वेगळ्या विदर्भाची देखील मागणी पुढे आली.

या भागात बाबासाहेबांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधाची कारणं आणि ४ (३ मोठी + मुंबई) राज्यांच्या समर्थनाची कारणं आहेत.

ह्यापुढे आपण आज जी तुलना करतो मुंबईची आणि मद्रास किंवा कलकत्त्याची तिच्याच आधारान बाबासाहेब देखील अस म्हणतात की ही कॉस्मोपॉलिटन (मराठी ?) शहरं जर त्या त्या राज्यात राहू शकतात तर मुंबई का नाही, आणि ह्याच कारणासाठी कोणताही मराठी माणूस मुंबई वेगळ करण का सहन करेल? मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करावी ह्यासाठी

महाराष्ट्राच्या बाजूनी खालील मुद्दे आहेत;

१. मुंबई मराठी माणसाच्या भांडवलावरती वर आलेली नाही, मान्य, पण मग कलकत्ता फक्त बंगाल्यांच्या आणि मद्रास फक्त मद्राश्यांच्या भांडवलावर उभारले आहेत का ?

२. मुंबईला पाणि, वीज आणि मनुष्यबळ यांचा पुरवठा उर्वरीत महाराष्ट्रातून होतो (इथे मुंबई वेगळी करा म्हणणारे दाभोळकर आठवले). महाराष्ट्र कोणत्याही क्षणी मुंबईच रुपांतर मोहेंजोदोडो मधे (City of the dead) करू शकेल.

३. गुजराती लोकांची, मराठी लोक त्यांच्याशी भेदभाव करतील ही भीती निराधार आहे. घटनेन तस करता येण अशक्य आहे.

आता वरील मुद्यांच्या विरुध्द आणि मराठी लोकांसाठी विचार करण्यासारख;

१. महाराष्ट्र मुंबईच्या विकासाठी पुरेस भांडवल उपलब्ध करू शकतो काय

२. जर या शहराची आर्थिक स्थिती बिघडली तर इथे राहणार्‍या मराठी लोकांच्या राहणीमानाच्या स्तरावरती काय परिणाम होइल? मराठी लोकांनी हे विसरता कामा नये की महाराष्ट्र हे एक कारकून आणि भोई (coolies) लोकांच राष्ट्र आहे.

आता ह्यापेक्षा एक वेगळा मुद्दा देखील इथे येतो. तो म्हणजे अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेचा. इथे सर्वत्र अल्पसंख्य म्हणजे हिंदू धर्मातील क्षत्रीय सोडून इतर जाती (इतर धर्म नाही). जर संयुक्त महाराष्ट्र झाला तर त्यांना जायला कुठेही जागा उरणार नाही. ज्यावेळेला गांधींच्या मृत्यूनंतर ब्राम्हणांना गाव सोडून जाव लागल तेंव्हा ते सगळे शहरांमधे जाऊन राहीले आणि आता सुरक्षित ठीकाणी पोचल्यावर तेच लोक संयुक्त महाराष्ट्राची मागणी करत आहेत. (जर वेगळी राज्य केली तर ही समस्या कशी सुट्णार हे नक्की कळल नाही)

ह्यात मुख्य चिंता व्यक्त केली आहे ती मराठवाड्याबद्द्ल. त्यावेळेला (१९५५) पुर्व महाराष्ट्र (विदर्भ) आणि पश्चीम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा हा अत्यंत मागासलेला भाग होता. पुर्व महाराष्ट्र हा औद्योगिक, व्यवस्थापकीय (administrative), न्यायव्यवस्था, करव्यवस्था (revenue) या सगळ्याच बाजूंनी पुढारलेला आहे. या दोन प्रगत भागांच्या मधे मराठवाड्याची ससेहोलपट होण्याचीच शक्यता जास्त. निजामाच्या या भागाकडच्या २०० वर्षांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शैक्षणिक दृष्ट्यादेखील मराठवाडा इतरांच्या मागे आहे. जर भविष्यात हा भाग पुणे विद्यापिठाच्या कार्यकक्षेत गेला तर त्याची अधोगती होण्याचीच शक्यता जास्त, कारण प्राप्त काळात पुणे विद्यापिठातील आणि मराठवाड्यातील शिक्षणाच्या दर्जात फार मोठी दरी आहे. मराठवाडा हा केवळ मागासच आहे अस नाही तर येथील लोक याबाबतीत उदासीन देखील आहेत.

ह्या तिन्ही राज्यांची उपलब्ध आकडेवारी अशी;

Name of State Total Population of the territory Area in square miles Total Revenue Total expenditure
Western Maharashtra 12677316 30028 262420441 not known
Central Maharashtra 12409044 55482 216380095 not known
Eastern Maharashtra 8027130 39004 94111012 not known
Total 33113490 124514 572911548 not known

याशिवाय संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचंड आकारामुळे देखील त्याच व्यवस्थापन अवघड होउन बसेल. संयुक्त महाराष्ट्राची खरोखर काय गरज आहे? उद्या महाराष्ट्राला उत्तर प्रदेश बरोबर युद्ध करायचे आहे का?

अजून एक महत्त्वाची गोष्ट जी संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात असलेली ती म्हणजे मराठा मंत्र्यांची राजकीय अक्षमता (incapability). काँग्रेसमधे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला काहीही किंमत नाही. जर तीन राज्य केली तर तीन मुख्यमंत्री आणि तिप्पट मंत्री यांना संधी मिळेल आणि जास्त मराठी पुढार्‍यांना संधी मिळेल, जेणेकरून अंतीमतः केंद्रात वजन वाढेल.

प्राप्त परिस्थीतीत मुंबई विधीमंडळात प्रगत असलेल्या पश्चीम महाराष्ट्रातील सदस्यांच प्राबल्य आहे. मुंबई विधिमंडळात एकूण सदस्य – ३१५ मराठी सदस्य – १४९ मंत्रिमंडळ (Council) – ७२ मराठी – ३४ या संख्याबलावरून मराठी मुख्यमंत्री व्हायला हवा हे सरळ आहे. परंतु मुख्यमंत्रीपदासाठी उभे राहेलेल्या श्री. भाउसाहेब हीरे यांना खाली बसवून वर मोरारजी भाई देसाईंच नाव पुढे करायलाही त्यांनाच सांगितल. ही महाराष्ट्राच्या पुढार्‍यांसाठी अत्यंत अपमानास्पद गोष्ट आहे. ह्यावरून काँग्रेसमधे मराठी पुढार्‍यांना काय किंमत आहे ते स्पष्ट होत. गैर्-काँग्रेसी पुढार्‍यांची केंद्रात फार पत आहे अशातला काही भाग नाही. आजमितीला श्री. टिळक, श्री. गोखले, श्री. रानडे यांच्या तोडीचा एकही पुढारी महाराष्ट्रात नाही.

जर पश्चीम महाराष्ट्रातील पुढार्‍यांची ही अवस्था, तर उद्या संयुक्त महाराष्ट्रात मराठवाड्यातल्या पुढार्‍यांची काय अवस्था होइल.

पाली भाषेतील साहित्यानुसार पुर्वीपासून त्रै-महाराष्ट्र असा उल्लेख सापडतो. त्यामुळे ३ मराठी राज्यांचा प्रस्ताव नवा नाही. जातिंच्या आधारावर जरी विचार केला तरी,जे संयुक्त महाराष्ट्राची मागणी करत आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्ण आहे की एका जातीतल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांनादेखील एकमेकांबद्द्ल काय वाटत? सातारच्या मराठा जातीच्या माणसाला औरंगाबादच्या मराठा जातीच्या माणसाबद्द्ल प्रेम आहे का? नाशिकच्या मराठा जातीच्या माणसाला रत्नागिरीच्या मराठा जातीच्या माणसाबद्द्ल काय वाटत ?

सद्ध्याच्या मुंबई कॅबिनेट मधील सर्व मराठा मंत्री सातारा (= सातारा + सांगली) आणि नाशिक मधले आहेत, कोकणातील एकही नाही.

याच्याशिवाय मराठी भाषिक भाग गैर्-मराठी राज्यांना देण हा उद्योग केवळ महाराष्ट्र द्वेषातून आणि महाराष्ट्राचे पंख छाटण्यासाठी केलेला उद्योग आहे.

सारांश :
१. संयुक्त महाराष्ट्र बनवण्यामागे महाराष्ट्राचा – मराठी माणसाचा काही फायदा होणार आहे अस दिसत नाही. किंबहुना नुकसानच होण्याची शक्यता जास्त.
२. जर संयुक्त महाराष्ट्र झालाच तर मराठवाडा पुर्व आणि पश्चीम महाराष्ट्राच्या मधे भरडला जाईल.
३. एकाच महाराष्ट्रामुळे एकावेळेला एकच मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ असेल पण ४ मराठी राज्य केली असता ४ मुख्यमंत्री आणि त्यांची मंत्रीमंडळ अस होइल जेणेकरून जास्त लोकांच प्रशिक्षण होइल.
४. लहान आकारांमुळे राज्य करण सोप होइल.
५. मुंबईच महाराष्ट्र शहर राज्य या नावान एक वेगळ मराठी राज्य कराव.
६. मराठी भाषकांचा इतर राज्यांना जोडलेला भाग केवळ आकसान जोडलेला असून, तो परत त्या त्या मराठी राज्यांना जोडण्यात यावा.

मला इथे प्रकर्षान एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, काँग्रेस नी महाराष्ट्राला कायमच डावलल आहे, अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली आहे याबाबतीत सर्व मराठीजनात, काँग्रेसचे सोडून (…), एकमत दिसत आणि तरीही इथे सर्वात जास्त काळ तोच पक्ष सत्तेत आहे हा फारच मोठा विनोद आहे.

संदर्भ : Thoughts On Linguistic States by Dr. B.R. Ambedkar (1955)

Follow

Get every new post delivered to your Inbox.