मुखपृष्ठ > वृत्तपत्र, समाज > वृत्तपत्र – एका वाचकाच्या नजरेतून

वृत्तपत्र – एका वाचकाच्या नजरेतून

The public have an insatiable curiosity to know everything.  Except what is worth knowing.  Journalism, conscious of this, and having tradesman-like habits, supplies their demands.
Oscar Wilde

If you’re not careful, the newspapers will have you hating the people who are being oppressed, and loving the people who are doing the oppressing.
Malcolm X

छोटा शर्व नुकताच वाचायला शिकलाय. सकाळी सकाळी आलेला सकाळ वाचायचा त्याचा प्रयत्न चालला होता. एक एक अक्षर जोडून स्वारी वाचायला लागली; “क रा ड म धे    वा ळू     मा फि या चा     भ र दि व सा      खू न”.  मी वैतागून त्याच्या हातातन पेपर काढून घेतला आणि त्याला चांदोबाच पुस्तक दिल.

मी स्वतः साधारणपणे वर्षापूर्वी रोजच वृत्तपत्र घ्यायच बंद केल.  रोज उठून हेच वाचायच असेल तर कशाला विकतची पिडा. सव्वाशे कोटींच्या या देशात फक्त आणि फक्त वाईटच घटना घडतात अस वाटायला लागल.  इथे वाईट घटना घडतात मान्य आहे पण चांगल्या घटना घडतच नाहीत का? मागे माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा एक लेख फिरत होता. ते इस्त्रायलला गेले असता तिथल्या वृत्त्पत्रांमधे पहील्या पानावरती चांगल्याच घटना होत्या. वास्तविक तिथे आदल्या दिवशी एक स्फोटात ८-१० लोक ठार झाले होते. ही बातमी देखील सगळ्या वृत्तपत्रांमधे होती, पण दुसर्‍या पानावर. त्यांनी प्रश्न विचारला होता की आपल्या देशात हे का घडत नाही.

जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे| शहाणे करून सोडावे सकळ जन || अस काहीतरी वृत्तपत्रांच्या अस्तित्वाच कारण असाव, बहुतेक. चांगल्या वाईट घटना ह्या समाजात घडणारच, त्यात नवल नाही पण त्यातल्या वाईटच गोष्टींच भांडवल कराव आणि लोकांना सतत भीतीच्या छायेत ठेवाव हा अट्टाहास का? समा़जात आता सर्व काही वाईट घडत आहे, इथली लोकशाही कोसळणार आहे, कलीयुग आल आहे अशा काहीतरी भावना निर्माण व्हाव्यात अशा पध्दतीन घटनांच सादरीकरण का कराव?

जनतेच्या मनात कसली ना कसली भीती असावी ही गोष्ट जगातल्या सर्वच्या सर्व सरकारांच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे, मग ते कधी एखाद राष्ट्र असेल, कधी एखादी विचारसरणी असेल तर कधी एखादा रोग,  जे काही असेल ते, हे मान्य. वृत्तपत्रांची अशी कोणती हतबलता आहे? पण नाही, समाजाला सतत कसल्या ना कसल्या तरी भीतीखाली ठेवल नाही तर आपल्याला अस्तित्वच नाही अशी भीती वृत्तपत्रांना वाटते की काय कोणास ठाउक. प्रत्येक घटनेची सनसनाटी बातमी केली की आपण कृतार्थ झालो असा भाव सगळ्या वृत्तपत्रांच्या ठायी दिसतो.

बर ज्या वाइट घडामोडी ठळकपणे देतात, त्यांचा तरी नीट अभ्यास केलेला असतो, पूर्ण माहीती घेतलेली असते अस फार फार कमी कमी वेळेला दिसत. समस्या मांडताना एखाद्या माणसान भडक वक्तव्य केल की तवढच छापून रीकाम व्हायचं. बाळासाहेबांच किंवा राजसाहेबांच नाव घेतल की हे लगेच स्पष्ट होइल. ते जे मुद्दे मांडतात ते सोडून त्यांच्या शब्दांवरतीच सगळीकडे भर दिसतो. किंवा अनेकदा दोन कुटूंबाच्यातल्या वैरातून भांडण होतात आणि किमान पच्चीम महाराष्ट्रात तरी ही परंपरागत असतात. आता जर ही कुटूंब वेगवेगळ्या जातीची असली की झालच, हमखास दुसर्‍या दिवशीचा मथळा असतो जातीय दंगली. वास्तविक उरलेल्या जातीला यांच्याशी काही देणघेण नसत, पण नाही, सत्य लिहील तर वाचणार कोण? विदर्भातल्या आत्महत्यांविषयी कोणी स्वतः दहा-पाच गाव फिरून, कागद बघून, चौकशी करून काही लिहील आहे अस माझ्या वाचनात तरी कुठे आल नाही. सत्ताधारीपक्षवाल्यांनी छापायच की लोक दारू पिउन मरतात, विरोधकांनी छापायच की सगळेच आत्महत्त्या करतात. शिवाय हे करताना आत्महत्त्या ह्या घातकी प्रकाराची जाहीरात होते तिकडे तर कोणाला लक्ष द्यायलाच वेळ नाही.
वास्तविक, किमान महाराष्ट्राला तरी, पत्रकारिता ही काही नवीन गोष्ट नाही. एक शतकापेक्षा जास्त अनुभव गाठीशी असलेल्या क्षेत्रात प्रगल्भता आणि सर्वसमावेषकता वाढण्याच्या ऐवजी बालीशपणा आणि संकुचितता वाढत चाललेली दिसते.

सगळी वृत्तपत्र ही कुठल्या ना कुठल्या राजकीय विचारसरणीची (किंवा त्यातल्याच कोणाच्या तरी मालकीची) असतात. पण त्या पुढार्‍यांच्या एकमेकातल्या लाथाळ्यांपायी वृत्तपत्रांनी आपली पातळी सोडण हा हीनतम प्रकार आहे. ह्याच ताज उदाहरण म्हणजे सकाळ आणि पुढारी मधे रंगलेला कलगीतुरा. ह्यान कोल्हापूरकरांची काही काळ तरी चांगलीच करमणूक केली. त्यात सामील असलेले लोक किती स्वच्छ चारित्र्याचे आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण तरीही कितीतरी काळ वृत्तपत्रांसारख अत्यंत महत्त्वाच माध्यम ह्या लोकांनी स्वतःची मळमळ बाहेर काढायला वापरल.

व्यक्तीशः माझ्या दृष्टीन दृकश्राव्य प्रसारमाध्यमांपेक्षा छापील प्रसारमाध्यमांना खूप जास्त महत्त्व आहे.  कारण दृकश्राव्य माध्यमांचा परिणाम हा तत्काळ आणि प्रभावी असला तरी तो टिकाउ नसतो. त्यामुळच त्यांचा दर्जा हा वृत्तपत्रांपेक्षा कितीतरी खालचा असला तरी त्यावर लिहावस देखील वाटल नाही.

जे सकस ते लोकांपुढ ठेवाव का जे, लोकांना जस आहे अस वाटत, तेच त्यांना सांगाव असा प्रश्न ह्या क्षेत्रातल्या लोकांना पडायचा बंद झाला असावा अन्यथा कुठल्यातरी स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी झटणार्‍या दादाच नाव हे आमटे, बंग, प्राचार्य शिवाजीराव भोसले असल्या चांगल्या गोष्टींसाठी आयुष्य खर्च करणार्‍या माणसांपेक्षा जास्त लिहील गेल नसत.

‘प्रसार’माध्यम ह्या प्रकारात बसणार्‍या वृत्तपत्रांनी स्वतःचा क्षेत्रीय अवाका इतका मर्यादीत ठेवावा ह्या गोष्टीच देखील मला नवल वाटत आल आहे. पच्चीम महाराष्ट्रातल्या कोणत्याही बातमीत विदर्भाचा संदर्भ हा फक्त आणि फक्त आत्महत्यांशी लावला जातो तर विदर्भातल्या वृत्तपत्रांमधे पच्चीम महाराष्ट्र हा फक्त लाटलेल्या निधीविषयीच येतो. मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले अस म्हणणार्‍या महाराष्ट्राला या राष्ट्राच्या पूर्व सीमेवरती कोणत राज्य आहे हे तरी माहीती आहे का? हाच प्रश्न राष्ट्रीय वृत्तपत्र म्हणवून घेणार्‍यांनी स्वतःला आंतरराष्ट्रीय गोष्टींबाबत विचारावा. महासत्ता बनायला निघालेल्या आपलेल्या देशाला स्वतःच्या शेजारी काय चाललय ते माहीत नाही.

वर्तमानपत्राल्या सध्याच्या भाषेविषयी तर सगळाच आनंद आहे. मराठी वर्तमानपत्रात वापरली जाणारी भाषा ही बहुतांशवेळा हिंदीच शब्दशः भाषांतर करून कींवा हिंदीकडून उधार उसनवार शब्द घेउन लिहीली जाते, मराठीला शब्दांची भीक लागल्यासारखी. खरतर वार्ताहराकडून येणारी बातमी ही कोणाच्यातरी डोळ्याखालून जात असेल. पण प्रत्यक्ष वाचताना मात्र अशी काही व्यवस्था अस्तित्वात तरी आहे का अशी शंका येते.

असो, इथे वर्तमानपत्रांप्रमाणेच, नुसत्या समस्या निर्माण करून जबाबदारी झटकण्यापेक्षा, वर्तमानपत्रांकडून असणार्‍या तुमच्या अपेक्षा तुम्हीही लिहा. वाचकाला जर काही किंमत असेल तर किमान हे वाचल जाइल एवढी अपेक्षा करायला हरकत नसावी.

  1. poonam patekar
    2011/01/08 at 16:43 | #1

    tumacha lekh manoman patala. kharach yawar sarvani visheshtaha vruttapatrakarani gambhiryane vichar karayala hawa, jyacha upayog dnyanasathi hoto tyacha asa bajar karu naye, shevati kuthetari pudhachi pidhi ghadnar aahe tyanchya samor yogya aadarsha asayala hawa.ajun khup sangawas watat aahe pan nantar bhetu

  1. No trackbacks yet.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.