अव्यक्त

प्रत्येक नात्याला नाव असलंच पाहिजे अशी एक साधारण धारणा असते. कुणाची असते तर माझी असते, आणि माझी का असते, तर माझी जडण घडण तशी झाली. प्रत्येक नात्याला नाव दिल म्हणजे मग, जाणीवपूर्वक म्हणा नाहीतर नकळत म्हणा पण त्या नात्याच्या नावाशी आपण इमान राखण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्याकडून तसा प्रयत्न होतो. हा निसरडा रस्ता असतो. हे नाव आणि त्याच्याशी इमान राखण्याचा प्रयत्न, बरेचदा स्वतःशीच होणाऱ्या द्वंद्वाला  कारणीभूत ठरतात. दिलेल्या नात्याशी इमान राखायच की भावनेशी आणि हा मग सगळाच गुंता होऊन बसतो.

तीच आणि माझं नात नक्की काय आहे हे मी आजपर्यंत ठरवू शकलो नाही. इथ ती “ती” असल्यामूळ आणि मी “तो” असल्यामूळ त्याला नाव दिल नाही तर एकंदरीतच गुन्हा ठरतो. त्यामुळ आमच्या या नात्याला देता येईल अस आणि प्रचलित व्यवस्थेत कशालाही धक्का लागणार नाही अस नाव द्यायचा प्रयत्न देखील काहींनी करून झाला पण काही जमल नाही.

आमची ओळख झाली त्याला बरेच वर्ष झाली, नक्की किती तेही आठवत नाही. ती लक्षात राहिली त्याच कारण तीच सौंदर्य. ती देखणी होतीच. पण तेवढंच एक कारण नव्हत हे कळायला अजून बराच काळ जावा लागला. इतर चार चौघींसारखीच आज्ञाधारक पतिव्रता, माता आणिक काय काय असतील नसतील ती सगळी विशेषण तिला लावता आली असती, येतील. पण त्याच्यापलीकड तीच काही अस्तित्व असेल आणि मला ते कळायचा काही संबंध येईल अस कारणही नव्हत. पण तस झाल खरं. ओळख झाल्यानंतर काही काळानी मी योगायोगान तिच्या शहरात आलो.

ती एवढी देखणी असून त्या माणसाची तिन नवरा म्हणून कशी निवड केली हा मला पडलेला पहिला प्रश्न होता तिच्या बाबतीत.

पहिल्यांदाच घराबाहेर पडल्यान बावचळून गेलो होतो. फोनवरून कधीतरी बोलत असू. तेव्हा एखाद्या अनुभवी शिक्षकान प्रेमान विद्यार्थ्याला सल्ला द्यावा तशी ती तेव्हा वागत असे अस आज वाटत. पुढ कधीतरी गप्पांच्या ओघात तिला वाचनाची आवड आहे कळल.

हळू हळू तिच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पदर उलगडत गेले.

सुसंस्कृत आणि सुशिक्षित आई वडील. ती स्वतः इतक शिकलेली.

पण बहीणीन प्रेम विवाह केल्यामुळ आई वडिलांच नाक कापल गेल. वडील वरिष्ठ जागेवर असल्यान समाजात (जातीत) नाव पत होती, त्याला धक्का लागलेला. त्यातच जर हीन देखील बहिणीच्या पावलावर पाउल टाकल तर कुठ तोंड दाखवायची सोय उरणार नाही. म्हणून आलेल्या पहिल्याच स्थळाला वडिलांनी होकार दिला. त्याला चांगली स्थिर नोकरी होती, भविष्याची चिंता नव्हती, पदर देखील जुळला होता. शेती, घर अश्या लग्न करताना आधी विचारात घेतल्या जाणाऱ्या सगळ्याच बाजू जमेच्या होत्या, त्यामुळ चिंता नव्हती.

लग्न केल्यावर किंवा खरतर झाल्यावर, लगेचच तिला भल्या थोरल्या आणि माणसांनी भरलेल्या घरात एकटीला टाकून तो निघून गेला. चौकोनी सुखवस्तू कुटुंबात आणि वडलांच्या लाडात सगळ आयुष्य गेलेल्या तिला हे जग नवीनच होत. बावरलेली ती आणि आजू बाजूला सगळ जगच अनोळखी. ती आणि ते घर हे एकमेकांच्यावर झालेल्या संस्काराविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होते. नवी सून अशी कशी असू शकते असा घराला प्रश्न पडलेला तर घर अस कस असू शकत हा प्रश्न तिला पडलेला.

कुणाशी बोलायची सोय नाही. कधी एकदा यातून बाहेर पडते अस तिला होऊन गेल, पण तेही शक्य आहे की नाही माहित नाही. कधी मधी नवरा येऊन जात असे. ते चार क्षण तरी सुखाचे असतील अस तिला वाटलं, पण लवकरच तीही आशा मावळली. तो आला तरी सासरच्या लोकांपुढ आणि नवऱ्यापुढ बायकोनी फार बोलायचं नाही असे संस्कार त्याच्यावर झालेले. त्यामुळ त्याच्यापुढ आणि त्याच्याशी बोलायची उरली सुरली शक्यता संपली. मग जेव्हा कधी माहेरी जाईल तेव्हाच तोंड उघडायची संधी.

बहीणीन जाती बाहेर लग्न केल असल तरी तिच्याशी बोलता येत असे. पण लग्न झाल्यावर, तिन जातीला बट्टा लावलाय अस मत असलेल्या त्यान त्या बोलण्यावर आणि त्यां बहिणीच अस्तित्व मान्य करण्यावरच बंदी घातली. पुढ मग त्याच्या नोकरीमुळ शहरात येऊन राहायाची सोय झाली आणि निदान गर्दीतल्या एकटेपणापासून सुटका झाली. आता हा एकटेपणा एकटीचा एकटेपणा होता.

पण त्याचा स्वभाव फारच संशयी होता. आता तो तसा होता की तीच शिक्षण, विचार करण्याची क्षमता, रूप यांनी निर्माण केला होता हे कळण अवघड आहे. पण ते कळलं म्हणून फार फरक पडणार आहे असही नाही म्हणा. पण त्यामुळ तिला कधी विश्वासात घेतलच नाही. अगदी साध्या साध्या गोष्टीत देखील. घरी कधी येणार हे देखील कधीच सांगत नसे. नेहमीच अचानक. ह्या अविश्वासामूळ तिला कुणाशी बोलायची देखील चोरी. जीव टाकणे वगैरे लांबच्या गोष्टी. माहेरचा काय असेल तेवढाच आधार. पण त्यांना देखील इकड यायला मोकळीक नाही.

हळू हळू एकटीच्या एकटेपणाची आणि अविश्वासापायी आलेल्या भीतीची देखील सवय झाली. पुढ थोडी मोकळीक मिळाल्यावर मग पुन्हा एकदां पुस्तकांशी ओळख झाली. आमच्या सगळ्या चर्चा अगदी सहज साध्या विषयांपासून ते गंभीर विषयांपर्यंत होत. मग वाढत्या वयातली मुलं असो की विश्वास पाटलांच महानायक असो. अगदी मनमोकळ बोलत असे ती. मीच त्या गप्पातल्या ह्या आमच्या अनामिक नात्याला न्याय देऊ शकलो का असा मला प्रश्न पडतो.

मला एका स्वतंत्र विचार करू शकणाऱ्या आणि तरीही नवऱ्याच्या माग गेलेल्या एका बायकोन लिहिलेलं पुस्तक तिन भेट दिल होत. मी ते बराच काळ वाचलंच नाही. वाचल्यावर पुन्हा विचार करू लागलो की हे तिन हेतुपुरस्सर तर दिल नसेल. अगदी तशीच नसली तरी बरीचशी थोडाफार तो प्रकार होताच. यशस्वी नवरा, चार चौघात नाव, मान मरातब आणि पैसे असल्यावर मिळणारे इतर फायदे. पण या सगळ्यात ती कुठंच नव्हती.

हेच पुस्तक तिला का आवडाव आणि मी इतक्या वर्षांनी तिला सांगितल्यावर तिला वाटणार आश्चर्य हेच सांगत होत का? माहित नाही. बहुतेक ते कधीच कळणार नाही आणी मी विचारायला जाणार नाही. कधी कधी काही गोष्टी न कळलेल्याच चांगल्या असतील. जोपर्यंत हे अव्यक्त आहे तोवर त्यात असंख्य शक्यता आहेत.

पण तिच्या अव्यक्त असण्यात मात्र शक्यतांपेक्षा अपरिहार्यता जास्त असावी, खूप जास्त असावी. आणि मी मात्र कायम विचार करत राहीन की तिच्या व्यक्त होण्यात किती प्रचंड शक्यता दडलेल्या आसतील. नसेलही कदाचित, काय माहित.

 

Advertisements

घरांचे ढिगारे…

मुंबईतल्या छप्पराच वास्तव.

मन उधाण वार्‍याचे...

एक अभूतपूर्व स्वप्ननगरी म्हणजे आपली मुंबई. दररोज आपल्या कामासाठी ह्या स्वप्ननगरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लाखो मुंबईकर घड्याळाच्या काट्यासोबत धावत असतात. भले मग तो कुठल्या मोठ्या हायफाय एमएनसीमध्ये काम करणारा असो, किंवा साधे वेठबिगारी करून पोट भरणारा असो कोणी थांबत नाही. सगळे सतत धावत असतात.. कधी एकत्र …कधी एकटे, तुम्ही थांबलात की संपलात.. बस्स !! प्रत्येकाची गरज वेगळी, आकांक्षा वेगळ्या, पण त्यात एक समान धागा म्हणजे “मुंबईत स्वतःचे हक्काचे घर

मुंबईत तुम्ही कधीही उपाशी राहणार नाही, पण तुम्हाला हक्काचे छप्पर सहजासहजी मिळेल याची हमी कोणीही देऊ शकणार नाही… ज्याप्रमाणे मुंबईचा विकास होत गेला, त्याप्रमाणे तेथे काम करणारा चाकरमानी दूरवर फेकला गेला. मुंबईचा पसारा अस्ताव्यस्त पसरला आणि त्यातूनच सुरु झाली जागेची बोंबाबोंब. अनेक बिल्डर्स ग्रुप्स, राजकारण्यांनी मोक्याच्या जागांवर वर्षानुवर्ष कब्जा करून ठेवला. जागांचे दर गगनाला भिडले आणि सामान्य माणसाला प्रत्यक्ष मुंबईत घर घेणे आवाक्याबाहेर गेले. मग जिथे परवडेल तिथे आपला संसार थाटून, तीच धावपळ नव्याने सुरु. लोकांची वस्ती वाढली आणि…

View original post 969 more words

महाभारताच गारुड

कुरुक्षेत्र

महाभारत

महाभारतातली पहिली कथा नक्की कधी ऐकली हे सांगण आता अवघड आहे. पण महाभारताबद्दलची उत्सुकता मात्र वाढतच गेलेली आठवतेय. सुरवातीला चमत्कारांची, वेगवेगळ्या अस्त्रांची, शाप-उःशापाची आणि आशीर्वादांची. जस जस वय वाढत गेल (कळायला लागल कि नाही ते अजूनही सांगता येत नाही, वय वाढणे हि गोष्ट मात्र खात्रीशीर झाली म्हणून) तसं तसं उत्सुकता असणाऱ्या गोष्टी बदलत गेल्या. मग राधा कृष्ण असोत, नाहीतर नपुंसक पांडू असोत किंवा पाच वेगवेगळ्या देवांपासून पुत्र प्राप्ती करून घेणारी कुंती असो.

मग याही पुढे आल्यावर हिमालायासारखी उंच पण तरीही मातीचेच पाय असणारी “माणसं” याचं विशेष वाटू लागल. व्यक्तिगत रीत्या मला रामायणापेक्षा महाभारत फार आवडत. त्यातली ती माणसं खरीखुर्या माणसांसारखी, उणीवा असलेली कधी उंच तर कधी खुरटी वाटणारी कधी अगदी योग्य धर्म शास्त्र संमत तर कधी सगळ्याला हरताळ फासून फक्त अहंकारी वागणारी माणस आहेत. ती गुंता गुंतीची आहेत. त्यांच्या कृती मागच्या प्रेरणादेखील तितक्याच गुंतागुंतीच्या आहेत.

माझ आवडत व्यक्तिमत्व म्हणजे कर्ण. हा इतका प्रतापी महापुरुष देखील द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला गप्प कसा बसला, हे कळत नाही, पण जेव्हा आदर्श म्हणवणारी माणस, केवळ समुहाचा भाग म्हणून समस्त मनुष्य जातीला काळीमा फासणाऱ्या गोष्टींच समर्थन करतात किंवां थेट त्या कृतीत सहभागी देखील होतात तेव्हा थोडासा उलगडा होतो. शिवाय व्यवस्थेन दाबलेल्या कर्णाला केवळ दुर्योधनान उघड उघड सन्मान दिला होता आणि सगळ्या श्रेष्ठ वीर पुरुषांनी त्याला धिक्कारल होत केवळ तो सूतपुत्र होता म्हणून आणि पुढेही धिक्कारल. जिच्याविषयी हे सगळ चालल होत, त्या द्रौपदीनदेखील त्याला धिक्कारलच होत. अस असताना दुर्योधनाच्या विरोधात जाणं त्याला कितपत शक्य होत याचा प्रश्न पडतो.

शांतिकालात सगळ धर्मानुसार करणारे पांडव युद्धकाळात सगळ्या नियमांना हरताळ का फासतात किंवा शांतता काळात कट कारस्थान करणारे कौरव युद्धात सगळे नियम कसे पाळतात हेही कळत नाही.

काय चूक आणि काय बरोबर यातली सीमारेषाच धूसर होत जाते म्हणून महाभारत जास्त जिवंत वाटत. महाभारत सगळ्यात पहिल्यांदा समोर आल ते वेगवेगळ्या कथांमधून, दूषण किंवा स्तुती मधून. मग त्यानंतर आली ती महाभारत मालिका. त्यामुळ इतकी पात्र त्यात होती आणि इतक्या सुरस घटना त्यात होत्या हे कळल.

मला आठवतंय तस मी सगळ्यात पहिल्यांदा राधेय वाचल. तिथूनच कदाचित कर्णाविषयी अनुकंपा निर्माण झाली असेल. महाभारताशी थोडीशी ओळख झाली. पुढे थोड सविस्तर मृत्युंजय वाचल आणि आणखीन थोडी माहिती मिळाली आणि आणखीन उत्सुकता वाढली. ते खरच घडल का नुसत्याच कथांमधून ते आकाराला आल, का ते थोड फार घडल आणि मग ते कथांमधून वाढत वाढत इथपर्यंत आल हाही प्रश्न पडू लागला. जर अस झाल असेल तर ते प्रत्यक्ष घडल्यापासून ते आजपर्यंत ज्यांनी कोणी त्यात भर घातली, ते ज्या समाजाचा भाग आहेत त्या समाजाची सृजनशीलतेला दाद द्यावीशी वाटते.

समजा, जस म्हटलं जात तस, फक्त व्यासानच लिहील असेल तर मग, व्यासोच्छिष्ट्म जगत्वंदे हे खर आहे अस म्हणायला लागत.

पुढे प्रथम पर्व आणि मग व्यासपर्व या दोन पुस्तकांमधून एक पूर्ण वेगळी आणि चमत्कार बाजूला ठेवून व्यक्तींच्या भोवती उभ केलेलं महाभारत आणखी विस्तृत आणि खोल असल्याच दाखवून देतात. तरी हा शोधाचा प्रवास संपत नाहीच.

आत्ता इथपर्यंत आलोय. आता मूळ महाभारत संपूर्ण वाचायची इच्छा जोर धरती आहे. जर संपूर्ण वाचल तर पुन्हा काहीतरी खरडीनच, न लिहीण अशक्य आहे.

आता थांबतो.

चित्र विकिवरून साभार.

राहिले रे दूर घर माझे…!

घर, ज्याना स्थिर घर मिळत त्यांच्यासाठी, जिव्हाळ्याची गोष्ट. त्यातही आपण वयात येताना ज्या ठिकाणी राहिलेलो असतो त्या आठवणी जन्मभर साथ देतात.

1+1=11

यक्ष यक्ष ५१ ‘यक्ष’, अष्टविनायक नगर. आमच्या नांदेडच्या घराचा पत्ता. घराला नाव देणे हा प्रकार अमेरिकेत बिलकुलच नाही. अपार्टमेंट मध्ये राहत असाल तर अपार्टमेंट कॉम्प्लेक्सला नाव असते. पण स्वत:चे घर असले तर मात्र त्याला नाव नसते. घराचा नंबर आणि रस्त्याचा पत्ता. नवीन-नवीन इथे आल्यावर मला ही गोष्ट फार प्रकर्षाने जाणवली होती. आपल्याकडे कसे ‘अमुक तमुक निवास’, ‘अमुक तमुक सदन’ किंवा ‘आशीर्वाद’ अशी नावं सर्रास दिसतात. बाबांच्या एका मित्रांच्या घराचे नाव तर चक्क शून्य! खरेच घराला नावं देण्याची सुरुवात कशी सुरू झाली असावी? बाबांनी मोठ्या हौसेने आमच्या घराला नाव दिले होते. ‘यक्ष’. त्यामागे दोन मुख्य कारणं होती. एक म्हणजे बाबांचे नाव विजय आणि आमच्या सगळ्यांची नावे ‘क्ष’ पासून जसे कि क्षिप्रा, क्षमा, क्षमता (आता या क्षमताचंमुग्धा कशीझाली हे वाचायचे असेल तर इथे वाचा!) आणि क्षितिज. मग बाबांच्या ‘य’ ने सुरुवात आणि आमच्या ‘क्ष’ ने शेवट. दुसरे कारण म्हणजे बाबा बँकेत मनेजर म्हणून काम करायचे. कुबेराच्या मनेजराचे नाव पण यक्ष! म्हणून…

View original post 1,210 more words

सरखेज रोझा

अहमदाबादमध्ये काम संपल्यानंतर जवळ जवळ अर्धां दिवस रिकामा होता. अहमदाबादमध्ये पाहण्यासारख काय आहे यावर चर्चा चालू असताना, सगळी नाव सांगून झाली, कांकरिया लेक, रिव्हर फ्रंट झाल.

प्रामाणिकपणे सांगायचं तर ती दोन्ही ठीकाण प्रेक्षणीय स्थळ नाहीत अस माझ मत झाल, फार तर संध्याकाळी फिरायला जायला ठीक आहेत पेन्शनरांना, पण खास पाहण्यासारख त्यात काही नाही. शिवाय रिव्हर फ्रंट मधल्या (साबरमती) रिव्हर मधलं पाणी वाहत नाही अस मी ठासून सांगीतल्यान महा-गुजरात युद्ध व्हायची वेळ आली, अखंड गुजरातच्या अस्मितेला धक्का लावलां असावा बहुदा मी हे वाक्य बोलून 😉 . तर असो.

अहमदाबाद शहरातच पश्चिम बाजूला सरखेज नावाच गाव आहे. पूर्वी (इ.स. १५००) च्या आसपास हिंदू विणकरांची वस्ती होती. तेव्हा तिथ शेख अहमद खट्टू गंज बक्ष नावाचे संत राहात होते. अहमद बादशहान निवृत्ती घेतल्यानंतर तो देखील तिथच जाऊन राहिला. त्यावेळेला केलेलं हे बांधकाम आहे. त्यामध्ये एक तलाव (हौज), एक मशीद, गंज बक्ष यांचा दरगाह, संग्रहालय आणि इतर बांधकाम समाविष्ट आहे. संपूर्ण रमझानच्या महिन्यात भाविक येऊन तिथ राहात असत अस म्हणतात. आज हा भाग संपूर्ण मुस्लीम बहुल असावा अस दिसत.

बांधकाम हिंदू, मुस्लीम आणि जैन पद्धतींचा मिलाफ आहे.

DSCN1059

DSCN1058

DSCN1063

दुरून मशिदीच दृष्य

DSCN1069

मशीद

मशीद

पेटंट्स फाईल करण्याच्या प्रोसेसची महिती.

"ज्ञान हीच प्रॉपर्टी "

आपल्या सशोधनाचे संरक्षण करण्यासाठी इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी कायद्यांतर्गत आपण आपल्या संशोधनाचे पेटंट फाईल करून त्याचा आपल्या बिझनेस साठी व पेटंट निगडीत प्रोडक्ट काढण्यासाठी उपयोग करू शकतो.

मागील भागात आपण  इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी  अंतर्गत पेटंट ची महिती पहिलीच आहे आता या अंकात आपण पेटंट फाईल कसे करावे ,कोणती गोष्ट पेटंट म्हणून स्वीकारली जाते, त्याची प्रोसेस काय या गोष्टींचा आढावा घेणार आहोत.

आपण आपले संशोधन नीट व व्यवस्थितपणे डॉक्युमेंट मध्ये मांडणे फार गरजेचे असते.पेटंट ड्राफ्ट लिहिताना त्यासाठी वापरला जाणारा प्रत्येक शब्द हा बरोबर वापरला गेला आहे कि नाही याची काळजी घ्यावी.

आपण पेटंट फाईल करण्याअगोदर ते या जगात प्रथम कोणी फाईल केले आहे कि नाही याचा शोध घेणे गरजेचे आहे.

हे काम इंटरनेटवर गुगल किंवा इतर पेटंट सर्च च्या वेबसाईटवर किंवा पेटंट ऑफिसमध्ये जाऊन अधिकृतपणे सर्च करू शकतो.

आपण आपले पेटंट इंटलेक्चुअल प्रोप‍‌‌‍र्टी ऑफिस मध्ये नोंद केल्यानंतर ही जो पर्यंत ते अधिकुत मान्यताप्राप्त होत नाही तो पर्यन्त त्या माहितीची गुप्तता राखणे गरजेचे आहे.

View original post 253 more words